बाबत

चरित्र : विनोद तावडे

विनोद तावडे यांचा जन्म 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना ते आपले आदर्श मानतात. या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात महत्त्त्वपूर्ण भूमिका आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुरुवातीच्या काळात त्यांना स्वर्गीय बाळ आपटे आणि मदनदास देवी यांच्याकडून प्रेरणा मिळाली. पुढे भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि श्री लालकृष्ण अडवाणी हे त्यांचे प्रेरणास्रोत बनले.

सक्रिय राजकारणात आल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे आणि श्री नितीन गडकरी यांच्यासोबत अतिशय जवळून काम केल्यामुळे विकासात्मक राजकारण आणि जनतेप्रती समर्पित वृत्तीने कार्य करण्याचे बाळकडू त्यांना मिळाले. यानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, श्री अमित शाह आणि श्री राजनाथ सिंह यांसारख्या दिग्गज नेत्यांकडून सर्वसमावेशक राजकारण आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करण्याची शिकवण आणि त्यासाठी व्यापक व्यासपीठ त्यांना मिळाले. आज मा. मोदीजींच्या नेतृत्वात, जनसेवेच्या माध्यमातून विकसित भारताचा पाया अधिक सशक्त करण्याचे कार्य ते करत आहेत.

वैशिष्ट्ये

दृढनिश्चयी स्वभाव, कठीण प्रसंगात शांत राहणे आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्याशी संपर्क साधणे हे विनोद तावडे यांचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच तळागाळातील जनतेशी घट्ट नाळ जोडलेले सुसंस्कृत राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण, विकासाचे व्यापक चित्र पाहण्याची क्षमता असलेली व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते.

राजकीय प्रवास

विनोद विजया श्रीधर तावडे भारतीय राजकारणी आणि जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते. आधी महाराष्ट्र आणि आता दिल्लीमध्ये, राष्ट्रहित आणि जनहिताप्रती असलेली बांधिलकी जपत ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. पक्षाला बळकटी देणे असो वा कोणत्याही मुद्द्यावर विरोधकांना नामोहरम करणे असो, आक्रमकतेसह विवेकाचा दिसणारा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि नेतृत्वाला खास बनवतो.

राजकीय पदे आणि जबाबदाऱ्या

कॅबिनेट मंत्री होण्यापूर्वी ते तीन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेतेही होते. 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस होते. विरोधी पक्षनेते म्हणून विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि अनियमितता यांच्या विरोधात सक्षमपणे आवाज उठवला, तसेच या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जनहिताचे महत्त्वाचे मुद्दे विधान परिषदेत मांडत असतानाच आपत्ती निवारणासाठी अत्यावश्यक निधी मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले. विनोद तावडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-१ ला मंजुरी दिली होती.

सध्याच्या जबाबदाऱ्या

विनोद तावडे यांनी आपला राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरू केला आणि सध्या ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, संसदीय कार्य यांसह मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. ( आपल्या कार्यकाळात मुंबई उपनगराचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले.)

इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची कायम भूमिका राहिली आहे. युवावर्गाशी संबंधित विविध मुद्द्यांना अग्रक्रम देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही ते नेहमी प्रयत्नशील असतात.